अनुवाद
धडा 34
 मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसग पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व प्रदेश दाखवला. 
2 नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला. 
3 तसेच नेगेव आणि सोअरा पासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हे ही दाखवले. 
4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू येथे जाणार नाहीस.” 
5 मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्याला सांगितले होतेच. 
6 मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही. 
7 मोशे वारला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची तब्बेत ठणठणीत होती व दृष्टी चांगली होती. 
8  इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले. 
9  मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्याला नवा नेता म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले. 
10  इस्राएलला मोशे सारखा दुसरा संदेष्टा मिळाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. 
11 मिसरमध्ये महान चमत्कार करुन दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसरमध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले. 
12 मोशेने करुन दाखवले तसे चमत्कार व आश्चर्यकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करुन दाखवल्या नाहीत. इस्राएलच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.