ईयोब

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42


धडा 31

“रस्त्यातल्या मुलीकडे अभिलाषेने न बघण्याचा करार मी माझ्या डोळ्यांशी केला आहे.
2 तो सर्वशाक्तिमान देव लोकांना काय करतो? तो त्याच्या स्वर्गातील घरातून लोकांची परतफेड कशी करतो?
3 देव दुष्टासाठी संकटे आणि विनाश पाठवतो. आणि जे चुका करतात त्यांच्यासाठी अरिष्टे पाठवतो.
4 मी जे काही करतो ते देवाला दिसते. माझी प्रत्येक हालचाल तो बघतो.
5 “मी खोटे बोललो नाही व लोकांना फसविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
6 जर देव योग्य तागडी वापरेल तर त्याला समजेल की मी निरपराध आहे.
7 मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळवले असेल किंवा माझे हात पापांनी बरबटलेले असतील.
8 तर इतरांना मी पेरलेले धान्य खाऊ दे. आणि माझे पीक उपटून घेऊ दे.
9 “माझ्या मनात स्त्रियांबद्दल लंपट भावना उत्पन्न झाली असेल किंवा शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करण्यासाठी त्याच्या घराचे दार उघडण्याची मी वाट पहात असेन.
10 तर माझ्या बायकोला दुसऱ्याचे अन्न शिजवू दे आणि दुसऱ्यांना तिची शय्यासोबत करु दे.
11 का? कारण लैंगिक पाप लज्जास्पद आहे. या पापाला शिक्षा झालीच पाहिजे.
12 लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
13 “माझे गुलाम माझ्या विरुध्द तक्रार करतात तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
14 तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ?
15 देवाने मला माझ्या आईच्या शरीरात निर्माण केले आणि त्यानेच माझ्या गुलामांनाही घडवले. देवाने आपल्या सर्वांचीच आईच्या पोटात निर्मिती केली आहे.
16 “मी गरीबांना मदत करणे कधीच अमान्य केले नाही. मी विधवांना नेहमीच त्यांना ज्याची गरज असते ते दिले.
17 मी माझ्या अन्नाविषयी कधीच स्वार्थी नव्हतो. मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले आहे.
18 मी जन्मभर पोरक्यांचा बाप बनलो. मी विधवांची काळजी वाहिली.
19 जेव्हा जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
20 त्यांना मी नेहमी कपडे दिले. मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली आणि त्यांनी अंत:करणापासून मला आशीर्वाद दिले.
21 माझ्या दाराजवळ एखादा पोरका मुलगा मदतीसाठी आलेला मला दिसला तर मी त्याच्यावर कधीही हात उगारला नाही.
22 मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून पडो मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
23 परंतु यापैकी कुठलीही वाईट गोष्ट मी केली नाही. मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते. परमेश्वराच्या महतीला मीघाबरतो.
24 “मला माझ्या श्रीमंतीचा कधीच भरंवसा वाटला नाही. देव मला मदत करेल याचा मला नेहमीच विश्वास वाटला. ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही.
25 मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.
26 मी चकाकत्या सूर्यांची सुंदर चंद्राची कधीच पूजा केली नाही.
27 सूर्य, चंद्राची पूजा करण्याइतका मूर्ख मी कधीच नव्हतो.
28 ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. मी जर त्या गोष्टींची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
29 “माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही.
30 माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करुन मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.
31 मी अपरिचितांना अन्न देतो हे माझ्या घरातील सर्वाना माहीत आहे.
32 परदेशी लोकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
33 इतर लोक त्यांचे पाप लपवायचा प्रयत्न करतात परंतु मी माझा अपराध लपवायचा कधीच प्रयत्न केला नाही.
34 लोक काय म्हणतील याची भीती मी कधीच बाळगली नाही. मी भीतीपोटी कधीच गप्प बसलो नाही. भीतीमुळे मी बाहेर पडायला कचरलो नाही. मला लोकांच्या तिरस्काराची भीती वाटत नाही.
35 “माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. मला माझी बाजू मांडू द्या. सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.
36 नंतर मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन.
37 देवाने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करुन मी देवाकडे येऊ शकेन.
38 “मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कुणीही करु शकणार नाही.
39 मी शेतकऱ्यांना माझ्या शेतातून मिळणाऱ्या धान्याबद्दल नेहमी मोबदला दिला आहे. आणि जे जमिनीचे मालक आहेत त्यांच्याकडून जमीन घेण्याचा प्रयत्न मी कधीही केला नाही.
40 मी यापैकी कुठलीही वाईट गोष्ट केली असेल तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे” ईयोबचे शब्द इथे संपले.