धडा 38

परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, मागोगमधील गोगकडे बघ मेशेखचा व तुबालचा तो अती महत्वाचा नेता आहे. माझ्यावतीने गोगविरुद्ध बोल.
3 त्याला सांग की परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, ‘गोग तू मेशेख व तुबाल यांचा अती महत्वाचा नेता आहेस. पण मी तुझ्याविरुद्ध आहे.
4 मी तुला पकडीन आणि परत आणीन. तुझ्या सैन्यातील सर्व माणसांना मी परत आणीन. घोडे व सर्व घोडेस्वार यांनाही मी परत आणीन. मी तुम्हाला सर्वांना वेसण घालून परत आणीन. सर्व सैनिकांनी गणवेश घातलेले असतील आणि ढाली व तलवारी घेतलेल्या असतील.
5 पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. 5पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. त्यांच्याजवळ ढाली असतील आणि त्यांनी शिरस्त्राणे घातलेली असतील.
6 त्याचप्रमाणे गोमर आणि अती उत्तरेचा देश तोगार्मा हेही आपापल्या सैनिकांबरोबर असतील. त्या कैद्यांच्या संचलनात प्रचंड संख्येने लोक असतील.
7 “सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हाला येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. तुम्ही लक्ष ठेवा आणि हुशार राहा.
8 पुष्कळ काळानंतर तुम्हाला कामाकरिता बोलविण्यात येईल. पुढील काळात युद्धातून तरलेल्या प्रदेशात, तुम्ही याल. ह्या प्रदेशातील लोकांना पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतून गोळा केले जाईल आणि इस्राएलच्या पर्वताकडे परत आणले जाईल. पूर्वी इस्राएलच्या पर्वतांचा पुन्हा पुन्हा नाश केला गेला. पण हे लोक इतर राष्ट्रांतून परत येतील. ते सर्वच्या सर्व सुरक्षित राहतील.
9 पण तू त्यांच्यावर चढाई करण्यासाठी येशील. तू वादळासारखा येशील. सर्व देशाला व्यापणाऱ्या, गडगडाट करणाऱ्या ढगासारखा तू येशील, तू आणि तुझ्याबरोबरचे इतर राष्ट्रांचे सैन्य ह्या लोकांवर हल्ला करण्यासाठी याल.”
10 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी तुझ्या मनात एक कल्पना येईल, तू एक दुष्ट बेत आखू लागशील.
11 तू म्हणशील, ‘तटबंदी नसलेल्या शहरांच्या देशावर (इस्राएलवर) मी हल्ला करीन. ते लोक शांतीने राहतात. त्यांना ते सुरक्षित आहेत असे वाटते. त्यांचे रक्षण करण्यास गावांभोवती तट नाही. त्यांच्या वेशींना अडसर नाहीत. खरे म्हणजे त्यांना वेसच नाही.
12 मी त्या लोकांचा पराभव करुन, त्यांची मौल्यावान संपत्ती लुटीन. पूर्वी नाश झालेल्या, पण आता लोक राहात असलेल्या स्थानांशी मी लढेन. इतर राष्ट्रांतून गोळा झालेल्या लोकांशी (इस्राएलशी) मी लढेन. आता त्यांच्याजवळ गुरेढोरे व मालमत्ता आहे. ते जगाच्या चौकात रहातात. शक्तिशाली देशांना इतर शक्तिशाली देशांकडे जाण्यासाठी त्या प्रदेशातून प्रवास करावाच लागतो.’
13 “शबा, ददान, दार्शीशचे व्यापारी आणि त्यांच्याबरोबर व्यापार करणारी सर्व गावे तुला विचारतील ‘तू मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यास आलास का? चांगल्या गोष्टी बळकावण्यासाठी व सोने, चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता लुटून नेण्यासाठी तू आपल्या सैन्याच्या जथ्याला घेऊन आला आहेस का? सर्व अमूल्य वस्तू घेण्यासाठी तू आला आहेस का?”
14 देव म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने गोगशी बोल. त्याला सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘माझे लोक शांतीने व सुरक्षीत राहात असतील, तेव्हा तू त्यांच्यावर चढाई करण्यासाठी येशील.
15 तू तुझ्या अगदी उत्तरेकडच्या प्रदेशातून येशील. तू तुझ्याबरोबर खूप लोक आणशील. ते सर्व घोड्यांवर स्वार होऊन येतील. तुझे सैन्य मोठे व शक्तिशाली असेल.
16 “तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसांत माझ्या देशाशी लढण्यासाठी मी तुला आणीन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे. मी तुला काय करील ते ते पाहातील.”
17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी, मी पूर्वी जे तुझ्याजवळ बोललो होतो, ते लोकांना आठवेल. मी माझ्या सेवकांचा, इस्राएलच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला हेही त्यांना आठवेल ‘मी तुला त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन असे इस्राएलच्या संदेष्ट्यांनी, माझ्यावतीने, पूर्वीच सांगितल्याचे त्यांना स्मरेल.”
18 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “त्या वेळी गोग इस्राएलच्या विरुद्ध लढण्यास येईल आणि मी माझा क्रोध प्रकट करीन.
19 माझ्या रागाच्या भरात आवेशाने मी पुढील वचन देत आहे. इस्राएलमध्ये मोठे भूकंप होतील.
20 त्या वेळी सर्व सजीव भीतीने कापतील. समुद्रातील मासे, हवेत भराऱ्या मारणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे सर्व छोटे जीव आणि सर्व माणसे ह्यांच्या भीतीने थरकाप उडेल. पर्वत व कडे कोसळतील. प्रत्येक भिंत जमीनदोस्त होईल.”
21 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “इस्राएलच्या पर्वतावर, गोरविरुद्ध मी सर्व प्रकारचे भय आणीन.त्याचे सैनिक भीतीने एवढे गर्भगळीत होतील की ते एकमेकांवरच तलवारीने हल्ले करुन एकमेकांना मारतील.
22 मी रोगराई व मृत्यू ह्याद्वारे गोगला शिक्षा करीन. गोग व पुष्कळ राष्ट्रांतून गोळा झालेल्या त्याच्या सैन्यावर गारा, आग व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
23 मग मी किती थोर आहे ते दाखवीन. मी पवित्र आहे हे सिद्ध करीन. पुष्कळ राष्ट्रे माझी कृत्ये पाहतील व मग त्यांना ‘मी कोण आहे’ हे कळू येईल. मग त्यांना पटेल की मीच देव आहे.”