मत्तय

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28


धडा 11

येशूने त्याच्या बारा शिष्यांना ह्या गोष्टी सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावांमध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला.
2 बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले.
3 आणि त्याला विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
4 येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा.
5 आंधळे पाहू शकतात. पांगळे चालताल. कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
6 धन्य तो पुरूष जो माझ्यामुळे अडखळत नाही.”
7 मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, “तुम्ही वैरण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?
8 तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्र घातलेल्या माणसाला पाहायला गेला होता काय? तलम वस्त्र घालणारे राजांच्या राजवाड्यात असतात.
9 तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हांला सांगतो, आणि संदेष्ट्यांपेक्षा अधिक असा योहान होता.
10 त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे:‘पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’ मलाखी 3:1
11 मी तुम्हांला खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.
12 बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचा स्वीकार व प्रसार प्रभावीपणे करीत आहेत.
13 कारण योहानापर्यत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले.
14 आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे.
15 ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
16 “या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबात्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे.
17 ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजविले तरी तुम्ही नाचला नाहीत आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही.’
18 योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात ‘त्याला भूत लागले आहे.’
19 इतरांप्रमाणेच मनुष्याचा पुत्र खात पीत आला. लोक म्हणतात, पाहा हा किती खातो? किती पितो? जकातदार व पापी लेकांचा मित्र, परन्तु ज्ञानाची योग्याता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.”
20 तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरांतील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.
21 “हे खोराजिना, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता.
22 पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.
23 आणि तु कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते शहर आतापर्यत टिकले असते.
24 पण मी तुम्हांस सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.”
25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या
26 होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला असेच करायचे होते.
27 माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
28 जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन.
29 माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल.
30 कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”