इब्री लोकांस

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13


धडा 7

हा मलकीसदेक शालेमाचा राजा होता. आणि तो सर्वोच्च देवाचा याजक होता. राजांचा पराभव करून अब्राहाम परतत असताना मलकीसदेक त्याला भेटला. मलकीसदेकाने त्याला आशीर्वाद दिला.
2 व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग त्याला (मलकीसदेकाला) दिला. मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो.
3 मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्यूची नोंद आढळत नाही. देवपुत्राच्या प्रतिमेशी तो हुबेहूब मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे.
4 यावरून तुम्ही पाहता की, मलकीसदेक किती महान पुरुष होता! मूऴ पुरुष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्याला दिला.
5 आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे लोकांकडून (आपल्या सहोदरांकडून), जरी ते अब्राहामाचे वंशज होते तरी, दशांश गोळा करावा.
6 मलकीसदेक लेव्याच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला. आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्याला (अब्राहामाला) त्याने आशीर्वाद दिला.
7 यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्र्ेाष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते.
8 एका बाबतीत म्हणजेच लेव्यांच्या बाबतीत, जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे.
9 एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करीत, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देत.
10 कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.
11 लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांना नियमशास्त्र दिले गेले पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता.
12 कारण जेव्हा याजकपणात बदल होतो तेव्हा नियमशास्त्रसुद्धा बदलणे अपरिहार्य होते.
13 कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे. व त्याच्या (लेवीच्या) वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याचकीय सेवा केलेली नाही.
14 हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभु यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.
15 आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारख येतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्ट होते.
16 मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने येशूला याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्याला याजक करण्यात आले.
17 कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे: “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस”
18 जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व तिरुपयोगी होता.
19 कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता एक अधिक चांगली आशा आम्हांला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
20 हेसुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले.
21 पण येशू जेव्हा याजक, बनला तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्याला सांगितले की,“प्रभूने शपथ वाहिली आहे, आणि तो आपले मत बदलणार नाही: ‘तू अनंतकाळचा याजक आहेस.’
22 याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे.
23 तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे पुढे ते याजकपद चालवू शकले नाही.
24 त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो सर्वकाळ राहतो.
25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
26 म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाण्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.
27 दुसरे मुख्य याजक जसे दररोज अर्पणे अर्पण करतात तसे करण्याची त्याला गरज नाही, जे इतर याजक पहिल्यांदा त्यांच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्याला करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वत:ला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे.
28 कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. परंतु नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन देण्यात आल्यामुळे पुत्र हा सर्वकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.