1 पेत्र

1 2 3 4 5


धडा 2

म्हणून सर्व प्रकारची दुष्टता, तसेच फसवणूक, ढोंगीपणा हेवा, निंदा यापासून सुटका करुन घ्या.
2 नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मिक दूधाची इच्छा धरा. यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल.
3 आता “प्रभु चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे.”
4 जिवंत धोंडा जो प्रभु येशू त्याच्याकडे या. जो जगातील लोकांकडून नाकारला गेला. पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे.
5 तुम्हीसुद्धा, जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहा. पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे. जे देवाला, येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे.
6 म्हणून खलील उतारा पवित्र शास्त्रात नमूद केला आहे:“पहा सियोनात मी कोनशिला बसवितो, जी मौल्यवान व निवडलेली आहे आणि जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही.”
7 तुम्ही जे या धोंड्यावर विश्वास ठेवता, त्या तुम्हांला तो मौल्यवान आहे, पण जे विश्वास धरीत नाहीत त्यांना,“बांधणाऱ्यांनी नापंसत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आहे.”
8 तो असा झाला, “एक धोंडा जो लोकांना अडखळवितो आणि एक खडक जो लोकांना पाडतो.”
9 पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.
10 एकवेळ तुम्ही लोक नव्हता पण आता तुम्ही देवाचे लोक आहात. एके काळी तुम्हाला करुणा दाखविण्यात आली नव्हती पण आता तुम्हाला देवाची करुणा दाखविण्यात आली.
11 प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा.
12 जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की, तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे.
13 प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा.
14 राजाच्या अधीन असा, जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा. कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रान्ताधिपतीने त्यांना पाठविले आहे.
15 म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अबिचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे.
16 मुक्त लोकांसारखे जगा. पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा.
17 सर्व लोकांचा आदर करा. ख्रिस्तातील तुमच्या बंधूवर्गावर प्रीति करा. देवाप्रती भीतीयुक्त आदर असू द्या. राजाला मान द्या.
18 घरातील गुलामांनो, संपूर्ण आदराने तुमच्या मालकाच्या अधीन असा, जे चांगले आणि दयाळू आहेत त्यांच्याशीच नव्हे तर जे कठोरतेने वागतात त्यांच्यासुद्धा अधीन असा.
19 कारण हे प्रशंसनीय आहे. जर एखादा त्याच्या अंत:करणात असलेल्या देवाच्या इच्छेसंबंधाने जागरुक आहे व अन्यायामुळे त्याला दु:ख सोसावे लागते.
20 कारण जर तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हांला मार मिळाला आणि तुम्हांला तो सहन करावा लागतो, तर ते देवासमोर मान्य आहे.
21 यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे; कारण ख्रिस्ताने देखील आपल्यासाठी दु:ख सहन केले आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालावे, म्हणून स्वत:च्या अशा वागण्याने आपल्यासमोर उदाहण ठेवले.
22 “त्याने कोणतेही पाप केले नाही, त्याच्या मुखात कपट नव्हते.”
23 जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने उलट अपमान केला नाही. जेव्हा त्याने दु:ख सहन केले तेव्हा त्याने धमकी दिली नाही. परंतु जो न्यायाने निवाडा करतो त्या देवाच्या हाती स्वत:ला सोपवून दिले.
24 त्याने स्वत:आमची पापे वाहिली त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे. आणि नीतीमत्त्वासाठी जगावे. त्याला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला आरोग्य मिळाले.
25 तुम्ही मेंढराप्रमाणे बहकत होता. पण आता तुमच्या जीवनाचा जो मेंढपाळ व संरक्षक त्याच्याकडे परत आला आहात.