धडा 28

शोमरोनकडे पाहा. एफ्राइममधील मद्यप्यांना त्या शहराचा फार गर्व आहे. आजूबाजूला सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे. शोमरोनमधील रहिवाशांना आपले शहर फुलांच्या सुंदर मुकुटाप्रमाणे वाटते. पण ते मद्यपान करून धुंद झाले आहेत आणि हा “सुंदर मुकुट” सुकून चालला आहे.
2 पाहा! माझ्या प्रभूकडे एक सशक्त व शूर वीर आहे. तो गारपिटीप्रमाणे व पावसाच्या झडीप्रमाणे येईल. वादळाप्रमाणे किंवा महापुराप्रमाणे तो या देशात येईल आणि हा मुकुट (शोमरोन) धुळीत फेकून देईल.
3 एफ्राइममधील मद्याप्यांना “सुंदर मुकुटाप्रमाणे” असलेल्या त्यांच्या शहराचा अभिमान आहे, पण ते शहर पायाखाली तुडविले जाईल.
4 सभोवती सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे. पण तो “सुंदर फुलांचा मुकुट” सुकत चालला आहे. उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे ह्या शहराची स्थिती होईल. जेव्हा माणूस झाडांवर अंजिरे पाहतो तेव्हा तो त्यांपैकी एक तोडतो आणि खाऊन टाकतो.
5 त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वर स्वत: “सुंदर फुलांचा मुकुट” होईल. जे काही देवाला अनुसरणारे लोक म्हणजेच देवाचे लोक मागे उरले असतील, त्यांच्याकरिता देव “सुंदर फुलांचा मुकुट” होईल.
6 परमेश्वर, त्याच्या लोकांवर राज्य करणाऱ्या न्यायाधीशांना सद्बुध्दी देईल. वेशीपाशी लढणाऱ्या लोकांना परमेश्वर सामर्थ्य देईल.
7 पण सध्या ते नेते मद्याने धुंद झाले आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत. ते अडखळून पडतात. संदेष्टे आपली स्वप्ने पाहताना मद्याच्या नशेत असतात. न्यायधीश न्यायनिवाडा करताना मद्याच्या धुंदीत असतात.
8 सर्व मेज ओकारीने भरलेले आहेत. कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.
9 लोकांना धडा शिकविण्याचा परमेश्वर प्रयत्न करीत आहे. त्याची शिकवण लोकांच्या लक्षात यावी म्हणून तो प्रयत्नशील आहे. पण लोक परवा परवापर्यंत आईचे दूध पिणाऱ्या तान्ह्या मुलांप्रमाणे वागतात;
10 म्हणून परमेश्वर लहान बाळांशी बोलावे तसा त्यांच्याशी बोलतो.एक हुकूम इकडे, एक हूकूम तिकडे; एक नियम इकडे, एक नियम तिकडे, एक धडा इकडे, एक धडा तिकडे.
11 परमेश्वर ह्या लोकांशी वेगळ्याच पध्दतीने बोलेल किंवा त्यांच्याशी वेगळ्याच भाषेचा वापर करील.
12 पूर्वीच्या काळी, देव लोकांना म्हणाला, “येथे विश्रांतीची जागा आहे. ही शांत जागा आहे. थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या. ही शांतीची जागा आहे.”पण लोकांनी देवाचे ऐकले नाही.
13 लोकांना देवाचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले.एक हुकूम इकडे, एक हुकूम तिकडे, एक नियम इकडे, एक नियम तिकडे, एक धडा इकडे; एक धडा तिकडे.लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
14 यरूशलेमच्या नेत्यांनो, तुम्ही परमेश्वराचा संदेश ऐकावा पण सध्या तुम्ही त्याचे ऐकायचे नाकारता.
15 तुम्ही लोक म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही. शिक्षा आमचे काही वाकडे करू शकणार नाही. कारण आम्ही कपट व असत्य याच्यांमागे लपून बसू.”
16 यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सियोनमध्ये मी कोनशिला बसवीन. हा एक अमूल्य दगड असेल. ह्या महत्वाच्या दगडावर सर्व बांधकाम उभारले जाईल. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची निराशा होणार नाही.
17 “भिंतीचा सरळपणा पाहण्यासाठी लोक जसा ओळंबा वापरतात, तसाच योग्य गोष्ट दाखविण्यासाठी मी न्यायबुध्दी व चांगुलपणा ह्यांचा वापर करीन.“तुम्ही पापी, तुमच्या कपटाच्या व असत्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता, पण तुम्हांला शिक्षा होईल. मी वादळाप्रमाणे अथवा पुराप्रमाणे येऊन तुमच्या लपायच्या जागा नष्ट करीन.
18 तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा पुसला जाईल. अधोलोकाशी तुमचा झालेला करार तुम्हांला उपयोगी पडणार नाही.“कोणीतरी येईल आणि तुम्हाला शिक्षा करील. तुमचा कचरा करून तुम्हाला पायाखाली तुडवील.
19 तो माणूस येऊन तुम्हाला घेऊन जाईल. तुमची शिक्षा भयंकर असेल. ती सकाळी सुरू होईल व रात्री उशिरापर्यंत चालू राहील.
20 “मग तुम्हांला पुढील कथा समजेल. एक माणूस त्याच्या उंचीच्या मानाने खूपच आखूड असलेल्या अंथरूणावर झोपायचा प्रयत्न करत होता. त्याचे पांघरूणसुध्दा त्याला पूर्ण पणे पांघरता येईल इतपत रूंद नव्हते. त्याचे अंथरूण आणि पांघरूण दोन्ही निरूपयोगी होती. अगदी त्याप्रमाणे तुमचे करार निरूपयोगी ठरलेले आहेत.”
21 परासीम डोंगरावरच्या प्रमाणे परमेश्वर लढाई करील. गीबोन दरीत ज्याप्रमाणे तो रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल.नंतर परमेश्वर त्याला पाहिजे ते घडवून आणील. तो काही विलक्षण गोष्टी करील, पण तो त्याचे काम तडीस नेईल. परमेश्वराचे कार्य अगाध आहे.
22 आता तुम्ही त्या गोष्टीविरूध्द लढू नका. लढलात तर तुमच्या भोवतीची फास अधिक आवळला जाईल.मी ऐकलेल्या शब्दांत फरक होणार नाही. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या, पृथ्वीच्या नियंत्याच्या, तोंडचे हे शब्द आहेत म्हणून त्या गोष्टी घडून येतीलच.
23 मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका.
24 शेतकरी सतत शेत नांगरतो का? नाही. तो सतत मशागत करतो का? नाही.
25 तो जमिनीची मशागत करतो आणि मग पेरणी करतो. तो निरनिराळ्या बियांची पेरणी निरनिराळ्या तऱ्हेने करतो. तो बडिशेप विखरून टाकतो, जिरे शेतात फेकतो तर गहू ओळीत पेरतो. तो सातू विशिष्ट जागेत पेरतो तर शेताच्याकडेला काठ्या गहू पेरतो.
26 तुम्हाला शिकविण्यासाठी आमचा देव उदाहरणे देत आहे. ह्यावरून दिसून येईल की देव विवेकबुध्दीने लोकांना शिक्षा करतो.
27 मोठ्या दातेरी फळीने शेतकरी बडिशेप मळतो का? नाही. मोहरी मळण्यासाठी शेतकरी त्यावरून गाडीचे चाक फिरवितो का? नाही. शेतकरी बडिशेप व मोहरी मळण्यासाठी लहान काठी वापरतो.
28 पाव करताना बाई पीठ मळते पण सारखी सारखी ते तिंबत नाही. परमेश्वर लोकांना शिक्षा करताना असेच करतो. तो गाडीचे चाक अंगावर घालण्याची त्यांना भीती दाखविल पण पूर्णपणे चिरडून टाकणार नाही. तो घोड्यांच्या टापांखाली त्यांना तुडवू देणार नाही.
29 हा धडा सर्वशक्तिमान परमेश्वराने स्वत: दिला आहे. देव चांगलाच सल्ला देतो. तो खरोखरच ज्ञानी आहे.