धडा 29

देव म्हणतो, “अरीएलकडे पाहा. तेथे दाविदाने तळ ठोकला होता. त्या शहराची सुटी वर्षानुवर्षे सुरूच आहे.
2 मी अरीएलला शिक्षा केली आहे. त्यामुळे ते शहर दु:ख व शोक यांनी भरून गेले आहे. पण तरीसुध्दा ते माझे अरीएल आहे.
3 अरीएल, मी तुझ्यासभोवती सैनिक ठेवले आहेत. मी तुझ्याविरूध्द मोर्चे बांधले आहेत.
4 तुझा पराभव झाला, तुला जमीनदोस्त केले गेले. आता भुताप्रमाणे जमिनीतून येणारा तुझा आवाज मी ऐकतो. तुझे शब्द, धुळीतून आल्याप्रमाणे येतात.”
5 धुळीच्या कणांप्रमाणे खूप परके येथे आहेत. ते क्रूर लोक, वाऱ्यावर उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे आहेत.
6 सर्वशक्तिमान परमेश्वराने भूकंप, मेघगर्जना व मोठा गडगडाट यांच्याद्वारे तुला शिक्षा केली. तेव्हा सगळीकडे वादळे, वावटळी व सर्वनाशक आग पसरली होती.
7 अनेक राष्ट्रे अरीएलविरूध्द लढली. ते सर्व रात्रीच्या दु:स्वप्नासारखे होते. सैन्यांनी अरीएलला वेढा घातला आणि शिक्षा केली.
8 पण त्या सैन्यांनाही ते स्वप्नासारखेच वाटेल. त्यांना पाहिजे असलेले मिळणार नाही. उपाशी माणसाला अन्नाबद्दलचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल. तो जागा झाला तरी त्याची तहान भागलेली नसते.सियोनविरूध्द लढणाऱ्या राष्ट्रांची अशीच स्थिती आहे. त्या राष्ट्रांना जे हवे आहे ते मिळणार नाही.
9 तुम्ही विस्मित व आश्चर्यचकीत व्हा. तुम्ही धुंद व्हाल पण मद्याने नव्हे. तुम्ही झोक जाऊन पडाल पण दारूने नव्हे.
10 परमेश्वर तुम्हाला झोपेची गुंगी आणील. परमेश्वर तुमचे डोळे मिटेल. (संदेष्टे हेच तुमचे डोळे आहेत) परमेश्वर तुमची डोकी झाकील. (संदेष्टे हेच तुमची डोकी आहेत.)
11 हे असे घडेल असे मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला माझे म्हणणे कळणार नाही. माझे शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाप्रमाणे आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्याला वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे. मी ते उघडू शकत नाही.”
12 किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”
13 माझा प्रभू म्हणतो, “हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व माणसांनी घालून दिलेले नियम आहेत.
14 म्हणून मी शक्तिशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांना विस्मित करीत राहीन. त्यांच्यातील सुज्ञ स्वत:तील शहाणपण गमावतील. त्यांना काही समजू शकणार नाही.”
15 ते लोक परमेश्वरापासून काही लपविण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांची दुष्कृत्ये अंधारात करतात. ते लोक स्वत:शीच म्हणतात, “आम्हांला कोणीही पाहू शकत नाही. आम्ही कोण आहोत हे कोणालाही माहीत नाही.”
16 तुम्ही गोंधळलेले आहात. तुम्हाला वाटते की चिखल व कुंभार सारखेच. तुम्हाला वाटते की एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला सांगेल, “तू मला घडवले नाहीस.” असे म्हणणे म्हणजे मातीच्या भांड्याने कुंभाराला “तुला काही समजत नाही” असे सांगण्यासारखेच होय.
17 हे सत्य आहे: काही काळानंतर कर्मेलच्या डोंगरावरील भूमीप्रमाणे लबानोनची भूमी सुपीक होईल आणि कर्मेलच्या भूमीवर घनदाट जंगल माजेल.
18 बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल आणि आंधळ अंधारातून आणि धुक्यातून पाहू शकेल.
19 परमेश्वर दरिद्री लोकांना सुखी करील आणि ते लोक इस्राएलच्या पवित्रदेवाबद्दल हर्ष व्यक्त करतील.
20 कोते आणि कंजूष लोक व दुष्कृत्ये करण्यात आनंद मानणारे लोक नाहीसे होतील तेव्हा हे घडून येईल.
21 (हे लोक सज्जनांना खोटे पाडतात. लोकांना न्यायालयात खेचून जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. ते भोळ्या लोकांना उध्वस्त करण्याचा यत्न करतात.
22 म्हणून परमेश्वर याकोबच्या वंशजांशी बोलतो. (ह्याच परमेश्वराने अब्राहामला मुक्त केले होते.) परमेश्वर म्हणतो, “याकोब, (इस्राएलमधील लोकांनो,) आता तुम्हाला ओशाळवाणे व लज्जित व्हावे लागणार नाही.
23 तो त्याची सर्व मुले पाहील आणि तो माझ्या नावाला पवित्र म्हणेल. मी ह्या मुलांना स्वत:च्या हाताने घडविले आहे आणि ही मुले म्हणतील की याकोबाचा पवित्र देव हा असामान्य आहे. ही मुले इस्राएलाच्या देवाचा आदर करतील.
24 ह्यातील पुष्कळांना काही कळत नव्हते म्हणून त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांना काही समजले नाही पण ते धडा शिकतील.”