जखऱ्या

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


धडा 12

इस्राएलबद्दल परमेश्वराचा शोकसंदेश. परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. माणसात आत्मा घातला. त्याने पुढील गोष्टी सांगितल्या:
2 “पाहा! मी यरुशलेमला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांचा विषाचा प्याला बनवीन. ती राष्ट्रे त्या नगरीवर चढाई करुन येतील. आणि सर्वच्या सर्व यहूदाला वेढा पडेल.
3 पण मी यरुशलेमला प्रचडं खडकाप्रमाणे करीन - जो तिचा कब्जा घ्यायचा प्रयत्न करील, तो स्वत:च जखमी होईल. त्या लोकांना जखमा होतील आणि ओरखडे उठतील. पण जगातील सर्व राष्ट्रे यरुशलेमच्या विरुध्द लढण्यासाठी एकत्र येतील.
4 पण, त्यावेळी, मी घोड्याला विथरवीन. त्यामुळे घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी शत्रूच्या घोड्यांना अंधळे करीन. माझे डोळे मात्र उघडे असतील. आणि माझी नजर यहूद्यांच्या लोकांवर असेल.
5 यहूदाचे नेते लोकांना प्रोत्साहन देतील. ते म्हणतील, “सर्व शक्तिमान परमेश्वर तुमचा देव आहे. तो आपल्याला बळ देतो.”
6 त्यावेळी मी यहूद्यांच्या नेत्यांना वणव्याप्रमाणे बनवीन. वणव्यात गवताची काडी जशी भस्मसात होते, तसे ते त्यांच्या शत्रूंचा नाश करतील. त्यांच्या सभोवतीच्या सर्व शत्रूंचा ते नाश करतील. यरुशलेमवासी काळजीमुक्त होतील व आराम करतील.”
7 परमेश्वर, प्रथम, यहूदाच्या लोकांना वाचवील म्हणजे युरशलेममधील लोकांना फारशा बढाया मारता येणार नाहीत. यहूदातील इतर लोकांपेक्षा आम्ही फार बरे अशा बढाया दावीदच्या घराण्यातील लोकांना आणि यरुशलेममधील अन्य लोकांना मारता येणार नाहीत.
8 पण परमेश्वर यरुशलेमच्या लोकांना वाचवील. सर्वात जास्त दुर्बल माणूससुध्दा दावीदासारखा वीर बनेल. आणि दावीदाच्या घराण्यातील पुरुष देवतांप्रमाणे होतील. परमेश्वराच्या स्वत:च्या दूताप्रमाणे ते लोकांचे नेतृत्व करतील.
9 परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, यरुशलेमशी युध्द करण्यास आलेल्या राष्ट्रांना नाश करण्याचा मी प्रयत्न करीन.
10 मी दावीदाच्या घराण्यात आणि यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांत करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी “एका”ला टोचले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल.
11 त्यावेळी यरुशलेममध्ये भंयकर शोककळा पसरेल आणि आक्रोश होईल. तो आक्रोश, मगिद्दोनच्या दरीत हदाद्रिम्मोनाच्या मृत्यूसमची झालेल्या आक्रोशासारखा असेल.
12 प्रत्येक कुटुंब आपापले दु:ख व्यक्त करील. दावीदाच्या कुळातील पुरुष, बायका दु:ख करतील. नाथानाचे घराणेही दु:ख करील. त्यांच्या बायकाही दु:ख करतील.
13 लेवी घराण्यातील पुरुष व बायका आपापसात शोक करतील. शिमी घराण्यातील पुरुष व बायका आपापसात शोक करतील.
14 आणि इतर कुळांतही असेच घडेल. पुरुष व स्त्रिया स्वतंत्रपणे शोक करतील.”