जखऱ्या

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14


धडा 4

मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने मला जागे केले. झोपेतून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे मला वाटले.
2 मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते आहे?”मी म्हणालो, “मला भरीव सोन्याचे दिवठाण दिसत आहे. त्यावर सात दिवआहेत. दिवठाणाच्या डोक्यावर एक वाटी आहे. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.
3 वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.”
4 माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, या गोष्टींचा अर्थ काय?”
5 तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?”“नाही महाराज!” मी म्हणालो
6 मग त्याने मला सांगितले “हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे. तो असा: ‘तुझ्या बलाने अथवा शक्तीने नव्हे तर माझ्या आत्म्याद्वारे तुला मदत मिळेल.’ सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
7 तो उंच पर्वत जरुब्बाबेलला सपाट प्रदेश वाटेल. तो मंदिर उभारेल. मंदिराचा सर्वांत महत्वाचा दगड बसविल्यावर लोक “सुंदर! सुंदर!”‘ असा जल्लोश करतील.
8 परमेश्वराच्या संदेशाने मला आणखी सांगितले,
9 “जरुब्बाबेल माझ्या मंदिराचा पाया घालेल. तो जेव्हा मंदिर बांधून पूर्ण करील तेव्हा तुम्हाला समजेल की सर्व शक्तिमान परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठविले आहे.
10 लोकांना लहानशा आरंभाची लाज वाटणार नाही. आणि जेव्हा जरुब्बाबेल ओळंबा घेऊन पूर्ण बांधून झालेल्या मंदिराची मोजमापे घ्याला लागेल व तपासून पाहील, तेव्हा त्यांना खरोखरीच आनंद वाटेल. तू पाहिलेल्या दगडाच्या सात बाजू म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्व काही पाहतात.”
11 मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?”
12 मी त्याला असेही म्हणालो की मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून सोनेरी तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
13 तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला ह्या गोष्टींबद्दल माहीती नाही?”मी म्हणालो, “नाही, महाराज!”
14 तेव्हा देवदूत म्हणाला, “परमेश्वराची सेवा करण्यासाठी सर्व जगातून निवडलेल्या दोन माणसांचीती प्रतीके आहेत.”