स्तोत्रसंहिता
धडा 115
परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
2 आमचा देव कुठे आहे, याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
3 देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.
4 त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
5 त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
6 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
7 त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
8 ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.
9 इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10 अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11 परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
12 परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13 परमेश्वर त्याच्या लहान आणि मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.
14 परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो.
15 परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
16 स्वर्ग परमेश्वराचा आहे. पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
17 मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18 पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.