स्तोत्रसंहिता
धडा 116
परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो ते मला खूप आवडते.
2 मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
3 मी जवळ जवळ मेलो होतो. मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते. माझ्या भोवती थडगे आवळले जात होते. मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो.
4 नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
5 परमेश्वर खूप चांगला आणि कृपाळू आहे. देव दयाळू आहे.
6 परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उध्दार केला.
7 माझ्या आत्म्या शांत हो! परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे.
8 देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस तू माझे अश्रू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस.
9 मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन.
10 “माझा सत्यानाश झाला” असे मी म्हणालो तरी मी विश्वास ठेवणे चालूच ठेवले.
11 मी घाबरलो होतो तेव्हा सुध्दा मी म्हणालो होतो, सगळे लोक खोटारडे आहेत.
12 मी परमेश्वराला काय देऊ शकतो? माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.
13 त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
14 मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन. आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.
15 परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
16 मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
17 मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन. आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.
19 मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन. परमेश्वराचा जयजयकार करा.