स्तोत्रसंहिता
धडा 145
देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
2 मी तुझी रोज स्तुती करतो. तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
3 परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात. त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
4 परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील. तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
5 तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे. मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
6 परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
7 तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.
9 परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.
10 परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
11 तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात. तू किती महान आहेस हे ते सांगतात.
12 म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते. तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते.
13 परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील. तू सदैव राज्य करशील.
14 जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो. जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.
15 परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
16 परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.
17 परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
18 जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात, त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो, त्याच्या अगदी जवळ तो असतो.
19 भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो. परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो. तो त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतो आणि त्यांना वाचवतो.
20 जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
21 मी परमेश्वराची स्तुती करेन. प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.