धडा 99

परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2 सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे.
4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 देव उंच ढगांतून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले.
8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे. –––––